Ad will apear here
Next
गुलमोहराशी संवाद साधताना...

माणसाच्या जगण्याचाच एक भाग असलेला निसर्ग माणसाला खूप काही शिकवत असतो. असे असताना अर्थातच माणसाने त्याच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणे अपेक्षित आहेच. या निसर्गाचाच एक भाग असलेला घटक म्हणजे झाड, वृक्ष. प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचे धडे देणाऱ्या या वृक्षांप्रति आपल्या भावना व्यक्त करण्याचा एक अनोखा उपक्रम सातारावासीयांकडून राबवला जातो तो म्हणजे ‘गुलमोहर रंगोत्सव.’ या उपक्रमाविषयी....
......................................................

निसर्ग हा माणसाच्या जगण्याचे एक प्रतीक आहे. आपले विविधरंगी, विविधढंगी असे सौंदर्य दाखवत असतानाच बऱ्याचदा तो रौद्र रूपही धारण करतो. असा हा माणसाच्या जगण्याचाच एक भाग असलेला निसर्ग माणसाला खूप काही शिकवत असतो. असे असताना अर्थातच माणसाने त्याच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणे अपेक्षित आहेच. या निसर्गाचाच एक भाग असलेला घटक म्हणजे झाड, वृक्ष. प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचे धडे देणाऱ्या या वृक्षांप्रति आपल्या भावना व्यक्त करण्याचा एक अनोखा उपक्रम सातारावासीयांकडून राबवला जातो तो म्हणजे ‘गुलमोहर रंगोत्सव.’

गेल्या १७ वर्षांपासून मे महिन्याच्या एक तारखेला हा गुलमोहर रंगोत्सव साजरा केला जातो. यामध्ये साताऱ्यातील कलाकार मंडळींचा विशेष सहभाग असतो. चित्रकार, कवी, लेखक वृक्षाप्रति, निसर्गाप्रति असलेल्या आपल्या भावना आपापल्या कलेच्या माध्यमातून व्यक्त करतात. खरे तर गुलमोहर हा इथे आम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपातील वृक्ष म्हणून घेतला आहे. विविध प्रकारच्या साहित्यात गुलमोहराला नेहमीच महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. गुलमोहरावरच्या अनेक कविताही आहेत. 

या रंगोत्सवात केवळ लेखक, कवी याच नाही, तर नर्तक, नाट्य सादरकर्ते अशा कलाकारांचाही आवर्जून सहभाग असतो. गुलमोहर या संकल्पनेवर आधारित कविता, लेखन याबरोबरच नृत्य आणि नाट्याच्या अंगानेही काही सादरीकरण केले जाते. मान्यवरांची व्याख्याने ठेवली जातात. कला क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या काही मंडळींचाही यात समावेश असतो. त्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध गोष्टींचे सादरीकरण या रंगोत्सवात केले जाते. एकंदरीत सर्वच कलांचा उपयोग करून त्यांना या रंगोत्सवात सहभागी करून घेऊन हा अनोखा महोत्सव साजरा केला जातो. 

विशेष बाब म्हणजे अगदी अकृत्रिम पद्धतीने हा रंगोत्सव साजरा केला जातो. पूर्णपणे नैसर्गिकरीत्या याची मांडणी केली जाते. यामध्ये कोणताही औपचारिकपणा पाळला जात नाही. महोत्सवासाठी कोणत्याही प्रकारची ध्वनिव्यवस्था नसते. या रंगोत्सवासाठी साताऱ्यातील असे एक मैदान निवडले आहे जिथे मोठ्या प्रमाणात गुलमोहराची झाडे आहेत. त्या ठिकाणी असलेले दगड, विटा, माती यांचा वापर करून रस्ते तयार केले जातात. गुलमोहराच्या पाकळ्या आणि तिथे असणारे गवत यांच्यापासूनच काही कलाकृती केल्या जातात. साधारणतः दोन सत्रांमध्ये हा रंगोत्सव साजरा केला जातो. सकाळी सात ते नऊ आणि सायंकाळी पुन्हा पाच ते सात अशा वेळेत यामधील सर्व उपक्रम घेतले जातात. 

सकाळी दोन चिमुकल्यांच्या हस्ते गुलमोहराच्या वृक्षाला पाणी घालून या रंगोत्सवाची सुरुवात करण्यात येते. मागील वर्षी या रंगोत्सवादरम्यान राबवण्यात आलेल्या काही नवीन उपक्रमांची छाप यंदाही पाहायला मिळाली. सागर गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या मानवाच्या चेहऱ्याच्या आकारातील आरशात पडलेल्या गुलमोहराच्या प्रतिबिंबाचे विशेष कौतुक झाले. हा मानवी चेहऱ्याचा आरसा यंदा एक आकर्षणाचा विषय ठरला. त्या मानवी चेहऱ्याच्या आरशात पडलेले गुलमोहराचे प्रतिबिंब पाहून गुलमोहरच जणू रसिकांशी संवाद साधत आहे असे भासत होते. 

या व्यतिरिक्त अनेक चित्रकारांनी रेखाटलेली चित्रे, नाटककारांनी सादर केलेले नाट्य, सायंकाळच्या सत्रात दिग्गज कवींच्या रंगलेल्या कविता या सर्व कलाप्रकारांनी रंगोत्सवात अधिक रंगत आणली. दर वर्षीप्रमाणे यंदाचाही हा विविधरंगी आणि विविधढंगी गुलमोहर रंगोत्सव खूप रंगला... 

यंदा महोत्सवाच्या संध्याकाळच्या सत्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘गुलमोहोरी काव्यसंध्या’ या कवितांच्या कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या काही विशेष कविता... 

कातर संध्याकाळी 
व्याकुळ डोळा पाणी...
क्षितिज रक्तरंगात
नि गुलमोहराची गाणी...
अन् फुले उमलुनी आली
गाणी गाता गाता...
काळीज जखम ओलेती
ती कशी दाखवू आता...
शब्दांनीही तेव्हा 
मौन असे पांघरले...
स्पर्शाला ते कळले...
अन् श्वासामध्ये उरले...
गुलमोहराची गाणी
ऐकतो फुलांमधुनि...
रंगांच्या रेषांमध्ये
जाते सहज विरूनी...
अस्तित्वाचे धागे
फुलात दिसती आता...
ऊर्ध्व मूलम् जगतो
मातीत मिसळता...
- मधुसूदन पत्की

कृष्णाने उधळले रंग
राधेच्या अंगावर,
चुकवले तिने सांडले
ते गुलमोहरावर

अजूनही वाजते तिथे
मधुर बासुरी
तिथेच अजून रंग
खेळतो श्रीहरी

चित्र तिथेच रंगते
कुंचला बहरतो
मोहरुनी बुंध्यातळी
शब्दही रांगतो

कोण कोण येत इथे
नाते जागवती
रंग पाघरुनी जणू
पुन्हा सजीव होती  
- डॉ. राजेंद्र माने

- चंद्रकांत कांबिरे 
ई-मेल : kambire11@gmail.com

(लेखक गुलमोहर रंगोत्सवातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालक असून, त्या वेळी सादर करण्यात आलेल्या ‘गुलमोहर आणि गुलबहार’ या नाट्याचे दिग्दर्शक आहेत.)

(शब्दांकन : मानसी मगरे)

साताऱ्याच्या या गुलमोहर रंगोत्सवाची झलक सोबतच्या ‘स्लाइड शो’मधून अनुभवता येईल.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZSYBC
 खूप छान संकल्पना. हा गुलमोहरी क्षण चुकल्याची हुरहुर वाटते. पुढच्या वर्षी नक्की सहभागी होणार. Bytesofindia मुळे या कार्यक्रमाची माहिती मिळाली. खूपखूप आभार.
Similar Posts
मसाल्यांच्या पदार्थांपासून साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन पुणे : लवंग, मिरी, दालचिनी हे मसाल्याचे पदार्थ खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी वापरले जातात; पण अरविंद जोशी यांनी मसाल्याच्या पदार्थांचा वापर करून चित्रे साकारली आहेत. या अनोख्या चित्रांचे ‘इंटरफ्यूजन’ हे प्रदर्शन सध्या दर्पण आर्ट गॅलरीमध्ये सुरू आहे.
कास पठारावरील रानफुलांच्या बहराला सुरुवात; यंदाचा हंगाम सुरू पुणे : दुर्मीळ जातीच्या रानफुलांनी बहरणारे कासचे पठार बघण्यासाठीची पर्यटक, अभ्यासकांची प्रतीक्षा आता संपली आहे. एक सप्टेंबरपासून वन विभागाने येथे भेट देण्याकरिता नावनोंदणी सुरू केली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language